पर्यटन स्थळे

श्री देवी सातेरी मंदीर

वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे गावातील ही सातेरी माता आपल्या अगाध लीलेने प्रसिद्ध आहे. वेतोरे येथील सोमेश्वर-रवळनाथ-सातेरी पंचायतामध्ये श्री देवी सातेरी देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील तसेच मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, गोवा अशा सर्व ठिकाणांहून भक्त तिला भजतात. वेतोरे येथील श्री देवी सातेरीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताच मन तृप्त आणि प्रसन्न होते.

श्री देवी सातेरीच्या पाषाणाच्या बाजूलाच श्री देवी भावई आणि श्री देवी शांतादुर्गा यांच्या पाषाण मूर्ती आहेत. तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी मानकरी व विरतिक यांनी गोव्यातून सिंधुदुर्गात येऊन वेतोरे येथे या देवीची प्रतिष्ठापना केली, असे सांगितले जाते. या देवीला असंख्य भाविक दर मंगळवार आणि शुक्रवार नवसाच्या रूपाने ओटी भरतात. असंख्य भाविकांनी या देवीच्या तीर्थस्नानाने त्वचारोग आणि सर्परोगांवर बहुमोल असा गुण लाभला आहे — हेच देवीचे मोठे माहात्म्य आहे.

अनेक वैद्यांकडून गुण न लाभलेल्या त्वचाविकारांवर या तीर्थस्नानामुळे कोकणातील असंख्य भाविकांना बरे वाटल्याचे सर्वश्रुत आहे. तसेच भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणूनही सातेरी देवीची ख्याती आहे.

वेतोरे येथील या देवीच्या माहात्म्यानुसार, वेतोरे गावातील मातीप्रमाणेच पाण्यालाही सुगंध दरवळतो, असे म्हणतात. या संदर्भातील आख्यायिका अनेक गावांमध्ये सांगितल्या जातात. सातेरी मातेच्या न्हावनाने (तीर्थस्नानाने) अनेक त्वचारोग बरे झाल्याचे पुरावे आहेत. काही पुराव्यांनुसार तिने सरपटणाऱ्या विषारी जीवांचे विष अमृतात रूपांतरित केले, असे मानले जाते.

विष अमृत करणारी, त्वचारोगांपासून मुक्त करणारी ही भू-माता सातेरी मंदिराच्या स्थापनेपासून मंदिराच्या आवारात असलेल्या विहिरीच्या पाण्याचा प्रतापही तितकाच अद्वितीय आहे. राऊळ समाजाकडून देवीची यथायोग्य पूजा केली जाते, त्यावेळी या विहिरीतील पाण्याने देवीस स्नान घालणे हेच ‘न्हावन’ समजले जाते. या न्हावनात दैवी शक्तीचा अनुभव आणि प्रत्यय येतो.

या सातेरीच्या मंदिरात भावई आणि भगवती या देवींचीही स्थापना आहे. या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे एका गोंधळी कुटुंबातील व्यक्ती न चुकता नवरात्रात येथे येऊन गोंधळ साजरा करतो. याशिवाय दर एकादशीला येथे पालखी सोहळा आयोजित केला जातो. अशा नवसाला पावणाऱ्या या देवीचा वार्षिक जत्रोत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.